© सुनीता मधुकर पाटील.
परिपूर्णतेचा आग्रह.
सायली... वय वर्षं ३०...एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत काम करते... ऑफिसच्या कामात नंबर वन आणि परिपुर्ण असणारी सायली घराकडेही तेवढंच लक्ष देण्याचा प्रयत्न करत असते. ऑफिस, घर सासु सासरे आणि मुलांची जबाबदारी सांभाळता सांभाळता दिवसाअखेर तिची दमछाक होते...ऑफिस आणि घर यांचा मेळ घालता घालता नवऱ्या बायकोच्या नात्यावर परिणाम होऊ लागला आहे.
मीनाक्षी... वय ३२...आठ तासाचा ( ९ ते ५ ) प्रायव्हेट जॉब... ऑफिसला जाण्यापुर्वी सासूसासऱ्यांचं आणि घरचं सगळं आवरून जावं लागतं... घरी आल्यावर मुलांचा अभ्यास, जेवण, घरातील इतर छोटी मोठी अनेक कामं...शनिवार रविवार साधुन घरी येणारे पाहुणे... मनात प्रचंड राग धुमसत असूनही सतत हसतमुख राहण्याचा अट्टहास ... परिणामी मनातला राग ओरडण्याच्या रुपात मुलं आणि नवऱ्यावर बाहेर पडत असतो आणि सततची होणारी चिडचिड.
घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळुन परिपुर्ण बनण्याच्या प्रयत्नात घड्याळ्याच्या काट्याबरोबर जीवन जगताना दोन क्षण निवांतपणे स्वत:साठी, नवऱ्यासाठी मिळणं खुप कठीण होतं चाललयं.
सायली, मीनाक्षी किंवा आजच्या बऱ्याच स्त्रिया करिअर साठी धडपडत असतात. त्यामुळे नोकरी करताना ऑफिस मध्ये स्वत:ची सक्षमता त्यांना सिद्ध करावीच लागते. त्याचबरोबर घराकडे लक्ष देणं, मुलं, सणवार, पाहुणे रावळे, ही स्त्रीचीच जबाबदारी आहे.या पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक समजूतीमुळे घरचं सगळं करताना स्वत:ला धन्य कृतार्थ झाल्यासारखं मानत असतात. पण, सगळ्याच आघाड्यावर होणाऱ्या या धावपळीचा परिणाम जाणवू लागतो. आणि यामुळे शारीरिक, मानसिक खच्चीकरन तर होतेच पण या सगळ्या त्रासाबरोबरच कौटुंबिक कलह निर्माण होतात आणि घरातील वातावरण गढूळ होऊ लागतं.
स्त्रियांना सगळ्याच ठिकाणी म्हणजे घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी परिपुर्ण बनावं लागतंय हे वास्तव आहे. पण, हा त्यांचा स्वतःचा आग्रह नाही तर ही त्यांच्या परिवाराकडुन केलेली अपेक्षा असते.
घर आणि नोकरी दोघांचा मेळ घालताना अनेकदा नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मनात आपण घराकडे, नवऱ्याकडे, मुलांकडे पुरेसं लक्ष देत नसल्याची अपराधीपणाची भावनाही मनात निर्माण होते.आणि याचाच परिणाम म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आपणच हसतमुखाने पार पाडायला हव्या, असं त्या स्वत:शी ठरवून मोकळ्या होतात आणि त्याप्रमाणे वागायला लागतात. पण, या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या नाहीत तर अपराधीपणाची भावना वाढू लागते. मग याचा त्यांना ताण येऊ लागतो. परिणामी कामाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे अपयश असं दुष्टचक्र निर्माण होतं. अशा प्रकारे ताण येण्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे सगळं टाळायचं तर वेळीच आपल्या जबाबदाऱ्यांचं नियोजन करायला हवं, अशा वेळी परिवारातल्या लोकांच सहकार्य ही खुप महत्त्वाचं असते. ऑफिसवरून घरी यायला उशीर झाला तर तिला थोडं समजुन घ्यायला हवं.
स्त्रिया मुळातच खुप संवेदनशील असतात. प्रत्येक गोष्ट नीटच व्हायला हवी, असा त्यांचा प्रयत्न असतो. यासाठीच ऑफिसमधून दमूनभागून घरी आल्यानंतरही पुन्हा तेवढ्याच उत्साहाने त्या घरची कामं करू लागतात. मनापासून किंवा मनाविरुद्ध सतत काम करत राहण्याचा ताण कालांतराने दिसून येतो. नवराबायकोच्या संबंधात तणाव, बीपी, डिप्रेशन, चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात. या सगळ्यातुन वाट काढायची असेल तर आपल्या प्रॉयॉरिटीज ठरवून कामांची विभागणी करा. वेळेनुसार प्रॉयॉरिटीज बदलत असतात. त्यांचं भान राखा. घरातील कामांसाठी नवऱ्याची, घरातील इतर सदस्यांची घ्या. घर सगळ्यांच असतं त्यामुळे जवाबदऱ्या सुद्धा सगळ्यांनी वाटुन घ्यायला हव्या. नोकरी करणं आज आपल्या घरासाठी आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन तिच्या कामात मदत करायला हवी. यासाठी घरातलं वातावरण खेळीमेळीचं राहिल, याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. पण यासाठी त्याग नाही तर तडजोड करा.
वैयक्तिक लाइफ आणि कामाची सांगड घालताना येणाऱ्या ताणामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात अनियमित मासिक पाळी, बीपी, आजार, डिप्रेशन, नकारात्मक विचार, चिडचिड, संशयी स्वभाव, कामाचा उत्साह कमी होणे. यावर एकच उपाय आपल्या प्रॉयॉरिटीज ठरवा, कामाची विभागणी करा, नवराबायकोंनी एकमेकांना वेळ द्या. दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा. या वेळात पुस्तक वाचा, गाणं ऐका, फिरायला जा किंवा शांत पडून राहा.
किंवा निरनिराळे छंद जोपासा.
घर आणि ऑफिस सांभाळणं खरचं कठीण काम आहे पण ज्या स्त्रिया ही जवाबदारी लिलया पेलतात त्या खरचं ग्रेट आहेत.
© सुनीता मधुकर पाटील.
All copyright reserved.
लेख आवडल्यास नावासहित शेअर करावा.
Tags:
लेख