© सुनीता मधुकर पाटील.
सुख माझ्या दारी.
सोन किरणांचा सडा
तांबडं फुटता दारी
पाखरांची किलबिल
त्या ओव्या जात्यावरील...
गरम भाकरी ठेचा
दही गाडग्यामधील
देई तृप्तीची ढेकर
झुणका अन आंबिल...
सर्जा राजाची जोडी
त्याला जुंपलेली गाडी
काट्याकुटयांची वाट
तुडवते आडनिडी...
पाटामधलं झुळझुळ पाणी
अन मोटंवरची गाणी
लगोरी विटीदांडू आणि
चांदोबाची गाणी...
कोणे एके काळी हे सारं वैभव माझ्या दारी हात जोडून उभं होतं. पैशाची श्रीमंती नक्कीच नव्हती पण नात्यांचा गल्ला मात्र नेहमी भरलेला असायचा. पण आता फक्त उरली आहेत नात्याचं भांडवल करून चालणारी भावनांची खरेदी विक्री आणि व्यवहारी नाती, सिमेंट काँक्रीटच्या इमारतींची जंगलं, आणि मोकळा श्वासाच्या शोधात भटकणारे जीव.
© सुनीता मधुकर पाटील
Copyright
All rights reserved.
Tags:
१०० शब्दांची कथा.