मधुनिता
इमान
मनावरच्या ओझ्यानं तिचा कण ना कण भारावला होता. रीती झालेली माळव्याची डाल तिला जड वाटली. राहून राहून संगीचा पडलेला चेहरा तिच्या नजरेसमोर येत होता तशी वसंताबद्दल मनात कणव दाटून आली. त्यानं जरी हिला टाकली असली तरी आईबानं पदरासंग गाठ बांधून दिलेला जन्माचा सोबती होता तो.
ती कोणा जहागिरदाराची लेक नव्हती पण हातात पैसा खेळायचा तिच्या. त्याचं जोरावर नऊ वर्षं दोघांचा संसार तग धरून होता. ती वसंतावर जीव ओवाळून टाकायची. त्याच्या प्रेमासमोर बाकीची सुखं तिला कस्पटासमान वाटायची.
पण तिची ही समजूत साफ खोटी ठरली. संगीनं त्याला भुलवला अन तिच्यापासून हिरावून नेला.
पदरात सात आठ वर्षांच लेकरू, त्याच्या मोहापायी तरी वसंताची पावलं माघारी वळतील आणि तो घरी परतेल ही वेडी आस ती मनात बाळगून होती पण ती ही फोल ठरली.
तसा भाजी विकण्याचा तिचा धंदा कधीच नव्हता. वसंतानं पाठ फिरवली अन हातातोंडाची गाठ पाडण्यासाठी तिनं भाजीपाल्याचं गठूळ डोस्कीवर घेतलं.
नशिबाचं भोग अन देवाची करणी समजून तिनं आपलं दुःख पाठीवर टाकलं आणि गेली सात आठ वर्षं लेकराच्या तोंडाकडं बघत एकटीच जीव जाळत जगत राहिली.
रोजच्या जगण्यातले ताळेबंद तिला कालचा हिशेब विसरायला भाग पाडत. उगवला दिस आपला हे एकच गणित तिला ठाऊक. ना कालची काळजी ना उद्याची चिंता.
भव्य अन रुंद कपाळावर ती कुंकवाचा ठसठशीत लाल रंगाचा बंदा रुपाया जरी मिरवत असली तरी हाय खाल्लेलं मन कधीच बोडकं झालं होतं. चालताना होणारा रुप्याच्या जोडव्यांचा खणखण आवाज तिला सुखावून जाई. तसा तिला दागिन्यांचा सोस कधीच नव्हता पण गळ्यात बांधलेल्या काळ्या डोरल्याचं तिला भारीचं अप्रूप. तिची आवड लक्षात घेऊन वसंतानही चांगलं पाच सहा पदरी मोठ्या वाट्यांच घसघशीत डोरलं तिच्या गळ्यात बांधलं होतं. तसंही वसंताच्या माघारी माणसाचं कातडं पांघरलेल्या लांडग्यांपासून तेच तर तिला राखत होतं.
पोरगं आता अकरावीत शिकत होतं. ते मोठं होईल, हाताखाली येईल. आपल्या कष्टाचं चीज होईल. ही एकच खूणगाठ मनाशी बांधून ती आला दिवस ढकलत होती.
वाळवीनं पोखरलेल्या अन गंजलेल्या कडीकोयंड्याच्या दाराला कुलूप लावून बाजार गाठला की मानगुटीवर बसलेली भूतकाळाची भुतं अन भविष्याची चिंता गप्पगार व्हायची.
फसवणुकीच्या वाटेनं वस्तीला आलेला बाजार तिच्याही नकळत तो तिच्या जगण्याचा भाग बनला होता.
" ए शांते, किधर ध्यान है रे तेरा। चल माझं चायपाणी निकाल।"
नेहमीची ओळखीची टाळी कानावर पडताच तिनं वर पाहिलं.
" अगं रेश्मे , आज येरवाळी आलीस." म्हणत तिनं कमरेच्या पिशवीतून दहा रुपयाची नोट काढली आणि तिच्यासमोर धरली.
तिच्याकडे भाजी घेण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे लोक येत. रेश्माही त्यातलीच एक. आईबापानं आणि समाजानं अस्तित्व नाकारलेली, नर आणि मादीच्या चौकटीत न बसणारी रेश्मा अन तिचं सुखदुःख शांतीला आपलं वाटे. तोंडावर स्नो अन पावडरचा जाडसर थर, ओठांना लालभडक लाली अन अंगावर फवारेलला उग्र सेंटचा दर्प तिला इतरांपासून वेगळ करी. हेच वेगळेपण नेहमी तिच्या अंगलटी येई. कधी कुणी तिला एकटीला गाठून तिची वाट अडवी तर कधी कुणी तिच्यावर हात टाकी. एकदा तर शांतीनं तिला माणूस म्हणवून घेणाऱ्या कोल्ह्या कुत्र्यांच्या तावडीतून सही सलामत सोडवली होती. तेंव्हापासून दोघी एकमेकीचं काळीज जाणत होत्या. शांतीनं दहाची नोट तिच्या हातावर टेकवावी अन तिनं आशीर्वाद देण्यासाठी तिच्या डोक्यावर हात ठेवावा हे रोजचंच झालं होतं. रेश्माच्या रुपात आई यमाईच आपल्याला आशीर्वाद देतेय असं तिला नेहमी वाटे.
" सून, वह तेरा मरद है ना वश्या और उसकी हिरुईनी वापस आई है। उसके बारे मे तेरेकू कुछ बताना था।"
" नगं सांगू, ठावं हाय मला."
" क्या, तेरेकू उसके बारे मे सब पता है?"
" व्हय, काल सकाळी संगी भेटली हुती."
" अब कायकू तरास देती है रे वह तेरेकू। नवरा पळवला उतना काफी नाय व्हय।"
" अगं तिचं सोड, मला ह्यांची काळजी वाटतीया."
" कुछ काळजी नही करने की उस हरामी की। तेरेकू अकेला छोडकर उस संगी के पिछे भागा तब तो तेरा ध्यान नही आया। अब इत्ते सालो बाद कायकू वापस आया। बिलकुल जवळ नही करने का उसको नायतर जाशील नवरा म्हणून त्याची काळजी करने को। संभाल खुद को, चलती मै।"
बडबडतच टाळी वाजवत ती निघूनही गेली.
संगी अन वसंताच्या आठ वर्षानंतर परतण्यानं गावात दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली. दरम्यान या आठ वर्षात शांतीनं गावात चांगलाच जम बसवला होता. ती एक सराईत व्यापारीन म्हणून ओळखली जात होती.
थेंब थेंब गोळा करावा अन त्याचा दर्या व्हावा असंच काहीसं तिचं झालं होतं. माळव्याची एक पाटी खपेपर्यंत दुसरी विकण्यासाठी ती हाजीर करी. भाज्यांचा सौदा होई तेव्हा व्यापाऱ्यांकडून सगळ्यात जास्त माल तीच उचलत असे. कुणी म्हणायचं तिच्या हातात लक्ष्मी आहे, कुणी म्हणायचं ती करणी करते. तर कुणी म्हणायचं ती वशीकरण करून माणसं काबीज करते.
जग तिच्या चारित्र्याचा पदर फाडून चिंध्या करायलाही मागं पुढं बघत नव्हतं पण ती एकटी सगळ्यांना पुरून उरली. जगाची रीत तिला ठाऊक होती. नवऱ्याच्या घरी नांदणारनीला पळ अन पळणारनीला नांद म्हणणाऱ्या जगाच्या उफराट्या
बोंबाचा तिच्यावर काडीचाही फरक पडत नसे. ठिकऱ्या उडालेल्या काळजावर आता कोणताच वार घाव करत नव्हता. रेश्मा अन तिची निर्मळ मैत्री देखील लोकनिंदेच्या तावडीतून सुटली नव्हती. नवऱ्यानं टाकलेली बाई म्हणून जगानं कितीही शिंतोडे तिच्यावर उडवले असले तरी एक सराईत व्यापारीन म्हणून बाजारात असलेलं तिचं अढळपद तिनं राखून ठेवलं होतं.
एकुलतं एक लेकरुचं आपला सुखाचा ऐवज म्हणून त्याला जीवापाड जपत होती.
कष्टाला मोल असतं हे तिनं जाणलं होतं. जगापुढं हात पसरून मिळणार दान कष्टानं तिच्या पदरात पडत होतं. नवरा असतानाच जर उंबरा नावाची वेस ओलांडली असती तर आपलासुद्धा मान वाढला असता. चार पैकं गाठीशी बांधता आलं असतं. नवऱ्याचं काळीजही बदललं असतं. एकटी असली की जर अन तरच्या सुयांनी भूतकाळात बसलेल्या निरगाठी सोडवण्याचा उगाचंच ती प्रयत्न करी.
संगी तशी तिच्या जिवाभावाची सोबतीण. तिच्यापुढं ती तिचं काळीज उलगडून ठेवायची. तिनंच मैत्रीला बट्टा लावत केसानं गळा कापला होता.
आई-बाप लहानपणीच वारल्याने माहेर नसलेली, सासू-सासऱ्यांसोबत कधीच पटवून न घेतल्याने एकट्या पडलेल्या संगीला हिनं जवळ केली.
कसल्याशा आजाराचं निमित्त झालं अन लाल कुंकवानं रसभरीत कपाळ बोडकं झालं. 'एकली बाई म्हंजी जगाला खुलं आवतान.' कोण कधी डुग धरून शिकार करलं काही नेम नाही म्हणून तिच्या काळजीपोटी तिला पोटाशी धरली. त्याचं संगीनं हिच्या नवऱ्याला वसंताला आपल्या रंगरूपावर भुलवला आणि एकेदिवशी सारं जग गाढ झोपेत असताना दोघांनी गाव सोडून पोबारा केला.
शांतीचं सारं आवसानच गळालं. जंग जंग पछाडत तिनं सारा गाव, तालुका, जिल्हा पालथा घातला पण दोघांचा कुठंच पत्ता लागला नाही. आपलं सौभाग्य परत यावं म्हणून देवदेवस्की, अंगाराधुपारा, नवस, गंडे दोरे जे कोणी जो काही उपाय सांगेल तो अगदी मनापासनं केला पण कशालाच यश येत नव्हतं. हरवलेला ऐवज धुंडाळता येतो पण ज्यांनी स्वतःलाच लपवून घेतलं त्यांना हुडकायचं तरी कसं हे तिला कळतं नव्हतं. ज्या दिवशी संगीला जवळ केली त्या दिवसाला ती कोसत होती. वाळवंटात बसणाऱ्या चटक्यांपेक्षाही जहाल तिच्या जीवाला संगीनं दिलेली डागणी तिच्या एकाकी जीवाला सोसत नव्हती. वसंताच्या वाटेकडं ती डोळे लावून बसली होती. तो लवकर परत यावा म्हणून तिचं काळीज कितीवेळा उलतापालथ झालं होतं याची तिलाच गणती नव्हती. त्याच्याकरता झुरणी लागलेलं काळीज हरणासारखं भटकत होतं.
दिस, मास, साल सरत गेले. दर दिवशी होणाऱ्या सांजेसोबत त्याची परत येण्याची आस मावळत गेली आणि ह्यातूनच एका नव्या खमक्या शांतीचा जन्म झाला.
एके दिवशी सगळा बाजार उठल्यावर उरलेलं भाजीपाल्याचं गाठोड घेऊन ती घराकडे निघाली. उरलेल्या भाजीपाल्याचं ओझं कुठपर्यंत मान ताठ ठेवील याची खात्री तिला नव्हती. डांबावरच्या दिव्याच्या उजेडात डांबरी तुडवत ती घरच्या दिशेनं निघाली होती. दिवस जरी बुडायला लागला असला तरी वैशाख झळा आपलं खरं रूप तिला दाखवत होत्या. तिची पावलं जड होत चालली. अंगापिंडान मजबूत शरीर तापानं फणफणलं होतं. ती जिवाच्या करारानं एक एक पाऊल टाकत असली तरी मागून कुणीतरी रेटा देत असल्याचं तिला भासत होतं. अखेर पायांचा आणि डोळ्यांचा मेळ चुकला अन ती भेलकांडून खाली पडली. डोसक्यावरचं भाजीचं गठूळ सुटून भाजी रस्ताभर पसरली. तिनं आधारासाठी इकडं तिकडं पाहिलं. तसा एक हात तिच्या नजरेला दिसला. तिनं वर पाहिलं. चेहरा ओळखीचा दिसल्याने ती जरा सावरली. नीट निरखून पाहिलं. दाढीची वाढलेली खुंट, बसलेली दालपाडं, खंगलेलं शरीर पण डोळे तेच घारुळे, घारुळ्या डोळ्यांनी शेवटी ओळख पटवली, वसंता!
त्याला पाहताच ती ताडकन उठली. डोळ्यात अंगार, वेदना सारं काही दाटून आलं. रागानं ती थरथरत होती. एक शब्दही न बोलता ती तरातरा घराच्या दिशेनं निघाली.
" ए शांते, माझं ऐक की जरा."
" सांगायला अजून शिलकीत काय हाय का?"
" अगं एकदा माझं म्हणणं तरी ऐकून घे."
" मला कायबी ऐकायचं नाय."
" अगं मी माझ्या कर्माची फळं भोगतुयं गं. मी मराय लागलुय शांते, हा पापी जीव जायच्या आधी तुझी पाय धरून माफी मागायची हाय."
ती क्षणभर थबकली, डोळे पुसले अन पुन्हा वाटला लागली.
" कर्माचा फेरा कुणाला चुकला नाय. मला माफी दे शांते, नाहीतर हा जीव सुखानं जायचा नाय. शांते.. शांते.."
हवेत विरणारे त्याचे शब्द ऐकायला ती तिथं होतीच कुठं. रपाट्याने ढांगा टाकत ती बरीच लांब गेली होती.
असंच आठवडा पंधरवडा सरत आला. संगी अन वसंताबद्दल रोज नवीन कागाळ्या गावात उठत होत्या. रोज काहीतरी नवीन तिच्या कानावर येत होतं. संगी अन वसंताला एड्स झाल्याची गावभर चर्चा रंगली होती. पण तिला काही फरक पडत नव्हता. दरम्यान वसंतानं बऱ्याचवेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण दर वेळी त्याचा प्रयत्न तिनं हाणून पाडला. एक दिवस उडत उडत बातमी कानावर पडली की संगीनं गावाबाहेरच्या पडक्या आटलेल्या विहरित उडी मारून जीव दिला. विहीर पडकी जरी असली तरी आत खोल होती. दगडावर जोरात डोकं आपटल्यामुळं कवटीच्या चिंधड्या उडाल्या होत्या. काठावर पडलेल्या बेवारशी चपलांमुळे लोकांना शंका आली आणि शोध घेतला तर संगीनं जीव दिल्याचं कळालं अन शांतीनं हबक खाल्ली. राहून राहून संगीच्या जागी तिला वसंताचा चेहरा दिसू लागला.
कॉलेजातून येऊन तिचं पोरगं कुऱ्हाडीनं चुलीसाठी लाकडं फोडत होतं. दुपारंधरनं आग ओकणारा सूर्य बुडाला होता. लायटीच्या डांबावरच्या बलाच्या उजेडात अंधारलेलं अंगण उजळून निघालं होतं. त्याचं ध्यान गावाकडून येणाऱ्या वाटेकडं होतं. लांबून येणाऱ्या आपल्या मायची सावली त्यानं अचूक ओळखली अन पाण्याचा तांब्या आणून उंबऱ्यावर ठेवला. आज ती एकटीच नव्हती सोबत कोणीतरी होतं. लांबून नीट ओळखता येत नव्हतं. पण जसजसे दोघे जवळ आले तशी ओळख पटली अन त्याची कानशिलं गरम झाली. गावात उडालेल्या वावड्यानीं आधीच त्याचं मन दूषित झालं होतं. संतापाच्या लाटा त्याच्या डोळ्यात उफाळून येत होत्या. वसंताला समोर पाहून तो दातओठ खात होता. आतल्या आत धुसमसणारा दुःखाचा निखारा पेटला होता कधी भडका होईल सांगता येत नव्हतं. त्यानं तिरिमिरीत पायात चपला चढवल्या अन जे दार आई येणार म्हणून उघडून तिची वाट पाहत होता त्याचं दारातून बाहेर पाऊल टाकलं. आपल्या लेकराचं मन आईविना जास्त कोण ओळखणार. त्याच्या रगारगात वाहणारं संतापाचं वारं तिनं हेरलं अन प्रश्न विचारून त्याची अडवणूक केली पण त्यानं तिचं काहीच ऐकून न घेता मुकपणानं घर मागं टाकलं.
संगीसारखं वसंतानं पण आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर ह्या भीतीनं आणि फक्त माणुसकीच्या नात्यानं ती डॉक्टरांकडं जाऊन आजाराची सगळी माहिती गोळा करून, काय काळजी घ्यावी, काय करावं, काय करू नये हे सगळं जाणून घेऊन त्याला घरी घेऊन आली होती. तिचा हाच निर्णय तिच्या लेकाला पटला नव्हता अन रागाच्या भरात त्यांनं घर सोडलं होतं.
राग शांत झाला की येईल परत म्हणून तिनं जरा कानाडोळा केला पण तास दोनतास उलटून गेलं तरी पोरगं घरी आलं नाही. तिचा जीव टांगणीला लागला. पाण्यावीन मासळीसारखी तिची तडफड व्हायला लागली. वसंता अन शांतीनं सारा गाव पालथा घातला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. पोरगं कुठं लपून बसलं होतं काही कळायला मार्ग नव्हता. त्याचे दोस्त, यार सगळ्यांकडे चौकशी करून झाली पण तो कुठेच नव्हता.
तिच्या ममतेची झालेली हजार शकलं ही त्याचं सांत्वन करू शकली नव्हती.
सगळे दिवस सारखे नसतात. हे दिवसही जातील हे तिला ठाऊक होतं पण संगी ज्यादिवशी तिच्या आयुष्यात आली त्या दिवसाला ती कोसत होती. दोनतीन दिवस ती बाजारातसुद्धा गेली नाही. तिचं व्याकुळ मन आपल्या रुसलेल्या लेकाचा पत्ता दावणीला बांधलेल्या गुरा ढोरांना, शेरडा करडांना, भांड्याकुंडयांना, भरणीतल्या तिखटा मिठाला विचारत होतं पण उत्तर कसं भेटणार.
आठवडी बाजारचा दिवस होता. सारा बाजार रंगबिरंगी रंगाची कपडे लेवून नटून बसला होता. मळेकरी, व्यापाऱ्यांनी जागा मिळेल तिथे पथारी अंथरून आपली दुकानं मांडली होती. रस्त्याच्या एका कोपऱ्यात जिथे जागा मिळेल तिथे तिनं आपलं भाजीचं दुकान थाटलं. नेहमीसारखं मोक्याची जागा पाहून दुकान थाटण्याचं तिच्यात बळ नव्हतं. पोराच्या काळजीनं तिचं काळीज करपलं होतं. बाकी कुणी गिऱ्हाईक येवो न येवो रेश्मा तरी रोजच्यासारखी तिचं हक्काचं चायपानी घ्यायला येईल याची तिला खात्री होती. पण तसं झालं नाही. रेश्मा आज आली नाही. संध्याकाळ होताच पावसानं आपली हाजरी लावली. उरलेला माल गिऱ्हाईक मागेल त्या भावाला विकून ती मोकळी झाली. तिची नजर रेश्माचा शोध घेत होती. शेवटी रिकामं झालेलं डालगं डोस्कीवर घेऊन ती घराकडची वाट तुडवू लागली.
घराच्या छताला लागलेल्या गळतीखाली रकटं अंथरून त्यावर पातेलं ठेवलं. एका कोपऱ्यात कोरडी जागा करून तिथं वसंताचं अंथरून टाकलं. पोराच्या आठवणीनं गलबललेलं काळीज डोळ्यातून टिपं गाळत होतं.
काठवटीत पीठ घेऊन तिनं चूल पेटवली आणि भाकरी थापू लागली. एक भाकरी तव्यात, दुसरी आराला, तिसऱ्या भाकरीचं पीठ ती मळतच होती की नेहमीची ओळखीची टाळी तिच्या कानावर आली. तिनं दाराकडं पाहिलं,
" काय गं शांते, नवरा वापस आते ही लेकाला इसरलीस?"
" अगं आत तर येशिल का नाय अन असं कसं बोलतीस तू रेश्मा. अगं माझा लेक माझ्या जगण्याचा कारण हाय. त्यांच्यासाठीच तर मी जित्ती हाय, नाहीतर कवाच जीव दिला असता."
" तो फिर इस हरामी को वापस घर कायकू लाई।" तिनं एक जळजळीत कटाक्ष वसंतावर टाकला.
" अगं माणुसकी म्हणून."
" फक्त माणुसकी की पुराना प्यार जाग उठा. उसकी बिमारी पता है ना!"
" अगं काय बोलतीस रेश्मे, ज्या दिशी ह्यानं संगीचा हात धरला त्यादिशीचं ह्याचा अन माझा संबंध संपला. बरं तू असं समज की लगीन झाल्यापासनं संगी ह्याच्या आविष्यात येईस्तोर ह्यानं मला लय जीव लावला. त्या प्रेमाचं पांग फेडून त्याच्या ऋणातून मुक्त हुतीया."
" कसलं ऋण, कसलं पांग. तू क्या बोल रही शांते मेरेकू कुछ समझ नही आ रहा।"
" अगं संगीसारखं ह्यानं पण आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं म्हंजी. अगं माणूस म्हणून माणुसकीच्या नात्यानं एक जीव जगवण्याचा प्रयत्न करतीया. तू तरी घे की मला समजून. ही दोघ इतकी वर्षं लांब हुती. डोळ्यामाघारी ह्या दोघांचं काय बरंवाईट झालं असतं तर मला कळलं पण नसतं आन त्याचं मला कायबी वाईट वाटलं नसतं पण आता परिस्थिती येगळी हाय. डोळ्याम्होर ह्याला कसं मरू देऊ. अगं दारात आलेल्या भुकेजल्या कुत्र्यालापण आपण भाकर तुकडा टाकतुयाच की. माझ्या मनात ह्याच्याबद्दल तुला वाटतं तसं कायबी नाय फकस्त माणुसकी."
" मेरेकू तेरा कुछ समझ नही आ रहा पण इतकं मात्र नक्की, तुझं मन लय मोठं हाय शांते."
" मनाबिनाचं मला काय ठावं नाय. एक माणूस म्हणून माणुसकीचं इमान राखाय पाहिजी एवढं मला कळतं. तू बसं म्या भाकरी टाकते, दोन घास खाऊन जा."
" व्हय, भाकरी तर खायेगीच मै और मै मेरे साथ किसी को लेकर आई है। उसे भी बहुत भूक लगी है।"
" कोण गं, तू तर एकटीच हायस."
" ओये, माय का लाल अंदर आजा।"
तिनं दाराकडं पाहिलं,
चार दिवसामागं डोक्यात राख घालून रागानं घर सोडून गेलेलं तिचं लेकरू दारात उभं होतं.
तिनं पळत जाऊन त्याला मिठी मारली. आईला पाहून त्याच्या डोळ्यात आलेलं पानी बाहेर बरसणाऱ्या पाण्यापेक्षाही शुद्ध होतं. अगदी त्याच्या आईच्या काळजातल्या माये ईतकं स्वच्छ व नितळ. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवाच्या डोहात त्याच्या आईचं काळीज न्हाऊन निघालं.
" अबे ये रोनाधोना बंद करो। दोघ मायलेकरं रडायला सारखीच, मेरे पेट मे अभी कावळे गोट्या खेल रहे है। चल जल्दी भाकरी वाढ।"
" व्हय व्हय, लगीचं ताटं वाढती."
शांतीनं लगबगीनं तिघांची ताटं वाढली. रेश्माकडं पाहून पुन्हा एकदा आई यमाईचं आशीर्वाद देण्यासाठी प्रकटल्याचा भास तिला झाला. तिघांना जेवून तृप्त होताना पाहून माणुसकीचं इमान राखल्याचं समाधान तिच्या मनाला लाभलं अन ती अंतरबाह्य उजळून निघाली.
समाप्त...
©️ सुनिता मधुकर पाटील.
30/12/2024
तर माझ्या वाचक मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. असेच आणखी ब्लॉग वाचायचे असल्यास माझ्या मधुनिता या फेसबुक पेजला नक्की follow करा. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि लेखकाच्या नावासहित शेअर करा.
© copyright
© all rights reserved.
या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही
